Saturday 4 November 2017

गुरुकुल- मातृभूमी परिचय शिबिर, झोळंबे, २०१७



'माझी शाळा' या विषयावर मला शाळेत असताना कधीच निबंध लिहिता आला नाही. माझी शाळा खूप वेगळी होती हे शाळेत असताना माहित होतं पण ती का आणि कशी वेगळी होती ते शाळा संपल्यानंतर जाणवू लागलं. शाळेने आपल्याला काय दिलं किंवा कसं घडवलं या गोष्टी हळू हळू बाहेरच्या जगात गेल्यावर कळू लागल्या.  
शाळेतून बाहेर पडून मला आता नऊ वर्षे झाली. पण या काळातल्या अंतराने शाळेपासून कधी दूर केलं नाही. उलट दिवसेंदिवस शाळा मनात जास्तीत जास्त घर करू लागली. ते म्हणतात ना एखाद्या गोष्टीची किंमत ती गोष्ट निघून गेल्यानंतरच कळते, तसंच काहीसं झालं.
याच जिवाभावाच्या शाळेसाठी आपण काही तरी करावं हि इच्छा खूप दिवसापासून मनात होती.
अखेर या वर्षी तो योग जुळून आला आणि यथायोग्य पार पडला.
हा सगळा अनुभव शब्दात लिहिणं माझ्यासाठी फार अवघड आहे, पण तरीही मी हा प्रयत्न करणार आहे.

आमची शाळा 'पंचकोशाधारित गुरुकुल, अंबरनाथ'
हि बारा तासांची शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. आमच्या शाळेत योगासने; प्राणायाम; गायन, वादन, नृत्य, चित्रकला इ. वेगवेगळे कलागुण; मैदानी खेळ अशा सर्व गोष्टी रोजच्या अभ्यासाबरोबर शिकवल्या जातात. याशिवाय कला व विक्री कौशल्य; अनेक क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तींचे परिचय व मुलाखती, क्षेत्रभेटी, वर्षा सहल, सायकल सहल इ. अनेक उपक्रम वर्षभरात घेतले जातात.
तसेच 'मातृभूमी परिचय शिबीर' हे ८ दिवसांचे निवासी शिबीर हा शाळेचा सर्वात महत्वाचा उपक्रम दिवाळीत असतो. प्रत्येक इयत्तेचा वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरासाठी जातो. याद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या देशाची, येथील संस्कृतीची ओळख व्हावी हा हेतू असतो.
असे एक शिबिर आमच्या गावी घ्यावे हे माझं गेल्या ४-५ वर्षांपासून स्वप्न होतं. ते यंदा पूर्ण झालं.
गुरुकुल चे इ. ७ वी चे यंदाचे शिबिर आम्ही झोळंबे, दोडामार्ग येथे आयोजित केले. संकल्पना माझी असली तरी ती प्रत्यक्षात आणताना, माझ्या घरच्यांनी व सर्व ग्रामस्थान्नी  मला खूप खूप सहकार्य केले. तसेच शाळेनेही इतक्या विश्वासाने हि जबाबदारी मला घेऊ दिली.
शिबिराची तयारी आम्ही ६ महिने आधीपासून करत होतो. व हि तयारी चोख असल्याने आम्हाला शिबिरकाळात फार अडचणी आल्या नाहीत.


‘पंचकोशाधारित गुरुकुल, अंबरनाथ'
मातृभूमी परिचय शिबिर
इ. ७ वी
२२ ते २९ ऑक्टोंबर २०१७
शिबिस्थळ- निकुंज, झोळंबे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग
शिबिरार्थी ३५
शिक्षक ५



दिवस १ - २२/१०/२०१७
उद्घाटनाचे सत्र - त्यावेळी झोळंबे गावचे विद्यमान सरपंच श्री. सतीश कामत उपस्थित होते. तसेच पहिले सत्र घेण्यासाठी सौ. पूर्णिमा केरकर आल्या होत्या. त्यांनी कोकणातील संस्कृती व तिचे पर्यावरणाशी असलेले नाते याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत श्री. राजेंद्र केरकर व मुलगी समृद्धी हेही उपस्थित होते.

सरांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. समृद्धीने सर्वांशी गप्पा मारल्या. ह्या गप्पांचा विशेष हेतू हा कि, समृद्धी हि बिनभिंतींच्या शाळेत शिकली आहे. तिला तिच्या आई वडिलांनी इतर मुलांसारखे शाळेत घातललेे नाही. तिचे संपूर्ण शिक्षण तिने आपल्या आई वाडीलांच्या मदतीने स्वताहून घेतले आहे. ती छान कविता करते, निसर्गात फिरायची तिला आवड आहे. उत्तम चित्र काढते. मुलांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारून तिचे या अनोख्या शिक्षणाबद्दलचे अनुभव जाणून घेतले.

दिवस २ - २३/१०/२०१७
यादिवशी सकाळी सावंतवाडीहून श्री. दादा मडकईकर वक्ते म्हणून आले. त्यांचे मालवणी भाषेवर प्रभुत्व व प्रेम आहे. त्यांचे मालवणी भाषेविषयीचे पुस्तक तसेच मालवणी कविता संग्रह प्रसिद्ध आहे.
त्यांनी मुलांना सहज आणि रंजक पद्धतीने मालवणी भाषेची ओळख करून दिली.

दुपारी आमचे शेजारी माणेरीकर यांच्या बागायती मध्ये भ्रमंती केली. श्री. गुरुदास व गिरिधर माणेरीकर यांनी मुलांना निरनिराळ्या औषधी वनस्पती, जायफळ, मिरी, दालचिनी, वेलची यांसारखी मसाला पिके तसेच नारळ, सुपारी, केळी इ. विषयी ती सर्व झाडे प्रत्यक्षात दाखवून माहिती दिली. नेहमी फक्त बाजारात पाहिलेल्या अनेक गोष्टी नेमक्या कशा व कुठून येतात हे पाहणे हा मुले व शिक्षक दोघांसाठी अविस्मरणीय अनुभव होता.
तसेच त्यांच्या गांडूळ खत व गोबर गॅस प्रकल्पाविषयी माहिती दिली.


दिवस ३ - २४/१०/२०१७
सकाळी गोव्याचे श्री. दिलीप बेतकीकर यांनी मुलांचे सत्र घेतले. आपल्या समाजाच्या व देशाच्या प्रति कृतज्ञता भाव व त्यातून मिळणारा आनंद या विषयावर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनाही त्यांची मते मांडण्यास व चर्चा करण्यास उद्युक्त केले. मुलांना एक Happiness song शिकवलं.

दुपारी दीड तास एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मुलांना श्री. गणू वझे यांनी नारळाच्या हिरापासून बनवलेली फुलांची परडी, श्री. गुरुदास माणेरीकर यांनी नारळाच्या झावळीं पासून बनवलेली झापं व श्री. गिरिधर माणेरीकर यांनी नारळाच्या हिरांपासून बनवलेली झाडणी या गोष्टी प्रत्यक्ष बनवून दाखवल्या. मुलांचे शंका निरसन केले. नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे का म्हटले जाते हे सर्वाना या कार्यशाळेतून समजले. तसेच अशा वस्तू आपण शहरात बाजारात विकत घेतो, त्यामागे किती मेहनत व कौशल्य आहे ह्याचा अंदाज मुलांना आला.






त्यानंतर 'सह्याद्री काजू कारखाना' येथे क्षेत्रभेट होती. तेथे मुलांनी काजू च्या बी पासून खायचा काजू कसा बनतो हे पहिले.

नंतर वाटेत तळकट वनाबाग येथे भेट दिली. हे एक वन परिक्षेत्र आहे. जंगलाची निरव शांतता, तिला भंग करणारे फक्त पक्षी व प्राण्यांचे आवाज, उंच गगनाला भिडणारी झाडे या सगळ्या गोष्टी मुले अनुभवत होती. नंतर मुले थोडा वेळ तिथल्या झोके व घसरगुंडी वर खेळली.


रात्री श्री. नंदू तुळपुळे यांनी मुलांना ‘दशावतारी नाटक’ - कोकणातील एक लोककला या विषयी माहिती दिली. ते स्वतः एक दशावतारी नाटक कंपनी चालवतात. त्यांनी प्रात्यक्षिक म्हणून एका मुलाचा make up करून दाखवला.


हा दिवस वैविध्य पूर्ण व थोडा दमणुकीचा गेला.

दिवस ४ - २५/१०/२०१७
सकाळी मुले व शिक्षक गोवा क्षेत्रभेटीसाठी गेले. दिवसभर गोवा दर्शन केले. आपल्या शेजारी राज्याची ओळख झाली.

दिवस ५ - २६/१०/२०१७
सकाळी मालवण ला सिंधुदुर्ग किल्ला दर्शन केले. दुपारी धामापूर तलावाकडे भोजन करून सगळे संध्याकाळी आंबोलीला पोचले. आंबोलीत Malabar Nature Conservation Club (MNCC) तर्फे श्री. हेमंत ओगले यांनी फुलपाखरांविषयी माहिती देणारे एक सत्र घेतले. त्यांनी काढलेलीे विविध छायाचित्र दाखवली.
रात्री ८ वाजता श्री. काका भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली येथील रस्त्यांवर रात्रीची सफर केली. तेव्हा ३ हरणटोळ जातीचे साप पहिले.

रात्रीचे जंगल कसे असते, कसे दिसते, कसे भासते याची कल्पना यावी हा या रात्र सफारीचा उद्देश होता.

दिवस ६ - २७/१०/२०१७
सकाळची अंघोळ नदीवर केली. लाकडी साकव (bridge) मुलांनी पहिल्यांदा पहिला. त्यावरून हळू हळू तोल सांभाळून चालण्याचा अनुभव घेतला. काही मुलींनी नदीत दगडावर उभे राहून योगासने केली. हि नादिवरची अंघोळ हा मुलांसाठी एक अद्भुत अनुभव होता. 





अशाप्रकारे सुचिर्भूत होऊन सगळी मुलं ग्रामदेवतेच्या मंदिरात गेली. तेथे आधी पोटोबा आणि मग विठोबा या उक्ती प्रमाणे आधी पोटभर न्याहारी करून मग मंदिरात उपासना केली. त्यावेळी गावातील गांवकर मंडळी उपस्थित होती. श्री. बाळा गांवकार यांनी मुलांच्या व शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी गाऱ्हाणे घातले. मुलाना 'गाऱ्हाणे' कसे घालतात याचे प्रात्यक्षिक कळले.


दुपारी बेळगावचे श्री. राहुल प्रभूखानोलकर यांनी दोडामार्ग-तिलारीतील जैवविविधता या विषयावर मुलांना थोडक्यात मार्गदर्शन केले. प्राण्यांचे काही गमतीशीर videos दाखवले.

या दिवशी सायंकाळी मुलांना ८ गटात विभागून, गावातील वेगवेगळ्या घरात पाठवले. ती एक रात्र मुलांनी गावातील लोकां सोबत घालवली. गावातील लोकांनीही मुलांचे अतिशय अगत्यपूर्वक स्वागत केले. येथील लोकांचे राहणीमान, दिनचर्या व जीवनशैली कळावी, खऱ्या अर्थाने मातृभूमी परिचय व्हावा हा या गृहभेटी मागचा उद्देश होता.


दिवस ७ - २८/१०/२०१७
सकाळी गृहभेटींवरून परतताना मुलं खूप नवीन अनुभव आणि नवीन उत्साह घेऊन आली. प्रत्येक गटाकडे काही ना काही विशेष होतं. एका गटाने रात्री वाघ पहिला, एकाने काय नवनवीन पदार्थ खाल्ले, कशा गप्पा मारल्या, घराचा रस्ता कसा होता या सगळ्या चर्चा रंगात आल्या होत्या.

सकाळी वंदना करंबेळकर मॅडम यांचं सत्र झालं. सत्राचा विषय खूप छान होता तो म्हणजे, 'शहरातील व गावातील विद्यार्थ्याच्या जीवनशैलीतील व शिक्षणातील फरक'. विशेष म्हणजे, मॅडम सोबत दोन विद्यार्थी आले होते. त्यांनी आपला शिक्षण प्रवास मुलांसमोर मांडला. त्यांचे अनुभव ऐकण मुलांसाठी खूप रोमांचकारि होतं.

दुपारी शिबीर समारोपाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मुलांनी काही समूहगीते, नृत्य व योगासनांचे प्रात्यक्षिक याची तयारी केली होती.


तसेच काही विद्यार्थ्यानी, शिक्षकांनी व आयोजकांनी आपले शिबिराचे अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, इतर सहकारी व निमंत्रित पाहुणे उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाची सांगता 'अखंड भारत' पूजनाने व संपूर्ण वंदे मातरम गायनाने झाली.


दिवस ८ - २९/१०/२०१७
या दिवशी सकाळी सर्व मुले कोलगाव, सावंतवाडी येथे लाकडी खेळण्यांच्या कारखान्यास भेट देण्यास गेली. तेथे लाकडी खेळणी कशी बनवतात व त्यांना रंग कसे देतात ते पाहिले. त्यानंतर बाजारातून खेळण्यांची मनसोक्त खरेदि केली.


मुलांनी शक्य त्या प्रमाणे आपल्या आई वाडीलांसाठी, भावंडांसाठी व मित्रमैत्रिणींसाठी वस्तू घेतल्या. त्यानंतर 'सावंतवाडी संस्थान-  राजवाड्यास’ भेट दिली. तेथील ऐतिहासिक वस्तूंचा व छायाचित्रांचा संग्रह पाहिला, इतिहास ऐकला. 'गंजिफा' - पूर्वी राजे महाराजे ज्या पत्त्यांनी खेळत, ते कसे बनवले जातात ते पाहिले.


सगळ्यात शेवटी सावंतवाडी रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सगळे मुंबईला निघाले.


या सगळ्या दिवसात मुले रोज सकाळी उपासना करत. सायंकाळी सायंप्रार्थना करत. रात्री दैनंदिनी लेखन करत. गृहभेटींना गेल्यावर प्रत्येक घरी आपली आठवण म्हणून काही पणत्या मुलांनी दिल्या, त्याही त्यांनी शिबिरा दरम्यान रंगवल्या. शिवाय दोन दिवसातून एकदा संपूर्ण निवास व्यवस्थेची साफ सफाई मुले स्वतः करत.





रोजचे जेवण केळीच्या पानावर जेवण्यात मुलांनी भरपूर आनंद लुटला. जेवणाची तयारी करणे, वाढणे इ. सर्व कामेही रोजच्या रोज कोणत्या मुलांनी करायची ते ठरलेले होते. रोजच्या जेवणात जास्तीत जास्त स्थानिक पदार्थांचा सहभाग होता. अळूची भाजी, केळफुलांची भाजी, कुळथाची उसळ व सार, नारळाच्या दुधातील शेवया, सोलकढी, भरली वांगी व भाकऱ्या, खांटोळी, गावठी पोहे इ. पदार्थ मुलांनी आवडीने खाल्ले. मुलांना एका ग्रामस्थांनी सेंद्रिय केळीचे दोन घड खाऊ म्हणून दिले तेही सर्वानी आवडीने खाल्ले.

सगळ्या मुलांबरोबरचे ८ दिवस हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. प्रत्येक मुलाबरोबर एक अनोखं नातं तयार झालं.मी शाळेत असताना केलेल्या सगळ्या शिबिरातून मी खूप काही शिकले, घडले. तशाच या मुलांच्या घडवणुकीत आमचा हा एक खारीचा वाटा. आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे "विकसित व्हावे। अर्पित होऊन जावे।". माझीही या शिबिरामागची हीच भावना होती. शाळेनं जे पेरलं ते उगवलं! मला माझ्या शाळेने जे काही दिलं ते मी माझ्या शाळेला, माझ्या गुरूंना अर्पण करू शकले यातच मला समाधान आहे.


1 comment: