Wednesday 10 March 2021

कावी कलेचा वारसा जपणारे श्री देवी माऊली मंदिर, झोळंबे

पुरातत्त्व शास्त्रज्ञ (archeologist) सौ. सावनी शेटये-मळीक यांनी कोकणातील, कर्नाटकातील कावी कलेचा विशेष अभ्यास केला आहे. जुनी मंदिरे, मूर्त्या यांचीही माहिती सांगायला त्या तत्पर असतात. नुकतीच त्यांनी झोळंबे येथील श्री देवी माउली मंदिराला भेट दिली. 
त्यावेळी कावी कलेचा इतिहास, काव म्हणजेच लाल मातीचा- गेरूचा रंग कसा तयार करतात? तो वर्षानुवर्षे टिकतो कसा? याबद्दल सखोल माहिती दिली.
कावी कलेतील भौमितिक आकार, पारंपरिक रामायण महाभारतातील कथांची चित्रे व ते रेखाटण्यासाठी वापरलेले निकृंत अभिकल्प अर्थात स्टेन्सिल्स चामड्यापासून तयार करण्याची पद्धत ह्यांचे वर्णन केले.
मंदिराच्या आवारात अनेक मुर्त्या आहेत त्यांतील क्षेत्रपाल, वेताळ, गजलक्ष्मी इत्यादींबाबत त्यांनी विशद केले.
क्षेत्रपाल म्हणजे गावाचे रक्षक. घोड्यावर स्वार, हातात भाले तलवार आदी शस्त्र धारण करणाऱ्या वीरांच्या ह्या मूर्ती आहेत.
वेताळ, म्हणजे शंकराचा एक गण. ह्याच्या हाता पायात नाग आहे. गळ्यात रुंडमाळ साखळीत अडकवलेली आहे. एका हातात शस्त्र आणि दूसऱ्या हातात कवटी धारण करणारा हा अघोरी आहे. वाईट शक्ती, मृतदेह अस्थीपंजर, नाग साप, हिंस्त्र प्राणी यांच्या बद्दल माणसाला नेहमीच भिती वाटत असते. म्हणून ह्या गोष्टी धारण करणारा व त्यांच्या पेक्षा प्रबळ असा हा वेताळ कल्पुन,आपले रक्षणासाठी त्याची स्थापना करण्यात आली.
तसे आपल्या संस्कृतीत प्रत्येक मंदिर, मुर्ती ही विचार पूर्वक काही दृष्टीकोन, संकल्पना देणारी आहे.
महिषासुरमर्दिनी ही राक्षसांचे निर्दालन करणारी स्त्री शक्ती,दूर्गा आहे.
कोकणातील सातेरी माउली ही भूमीमातेचे रूप आहे. सातेरी म्हणजे वारूळ. वारूळ जिथे असते तिथे माती उपजाऊ सुपिक असते. तिथे वस्ती करून, उत्तम शेती करता येते. अशा ठिकाणी आधी जमिनीची प्रत दाखवणाऱ्या त्या वारूळाला देवी, माता स्वरूपात पुजतात. वारूळाला बांगड्या, तोडे पैंजण,असे अलंकार घालतात,साडी चोळी नेसवतात, मुखवटा बसवतात. वारूळ जमीनीतून उगवते, म्हणून ते गर्भस्वरूप, नवनिर्मिती चे ही प्रतिक आहे.
गजलक्ष्मी ही लक्ष्मी स्वरूप, भरभराट, समृद्धीची देवता आहे. तीच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत. हत्तींच्या सोंडेने एक घागर धरली आहे. ह्या घागरीत, ते थेट आभाळातून पाणी घेऊन लक्ष्मी मातेला भूमातेला अभिषेक करतायंत. 
सृष्टीतील जीवन चक्र दर्शवणारी,भरण पोषण करणारी ही देवता, आणि कृतज्ञतेने तीला पुजणारे आपले पुर्वज, हा आपला वारसा आहे आणि प्रयत्नपूर्वक आपण तो जपला पाहिजे.

_श्री विनायक पटवर्धन.

No comments:

Post a Comment